अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :-दरवर्षी मोठ्या थाटामाटात लग्नसमारंभ होतात मात्र गेल्यावर्षी कोरोनाने साध्या पद्धतीने लग्नसमारंभ आटोपण्यात आले होते. यावर्षी कोरोनाचे सावट कमी झाल्याने ‘यंदा कर्तव्य आहे’ अशा वधू-वरांसाठी वर्षभरात ६३ शुभ मुहूर्ताच्या तारखा आहेत. तुळशी विवाह झाल्यानंतर लगीनघाईचे दिवस सुरू होतात.

यंदा २० नोव्हेंबरपासून मुहूर्त सुरू होणार असून, ९ जुलैपर्यंत चालणार आहे. डिसेंबर व मे महिन्यात सर्वाधिक मुहूर्त असल्याने हे दोन महिने लग्नाच्या धामधुमीचे ठरतील. कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर लग्नसराईला ब्रेक लागला होता. गेल्यावर्षी दिवाळीनंतर ५० लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने लग्नसोहळे साजरे करण्यात आल्याने नागरिकांना लग्नात आनंद साजरा करता आला नाही.

आता तुळशी विवाहानंतर २० नोव्हेंबरपासून सनईचे सूर वाजण्यास सुरुवात होणार असून, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या वर्षी लग्नाच्या बोहल्यावर जाणाऱ्या वधू-वरांसाठी ६३ तारखा शुभमुहूर्त म्हणून आहेत. डिसेंबर व मे या दोन महिन्यांत सर्वाधिक प्रत्येकी ११ मुहूर्त असल्याने वधू-वर पित्याची आतापासूनच लगीनघाई सुरू अाहे.

साधरणत: दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीचे संकट देशासह राज्यावर आले. त्यानंतर सर्वच गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले. यामुळे अनेक विवाहोत्सुक तरुण- तरुणींना साध्या पद्धतीने लग्न करावे लागले. तर मंगल कार्यालयावरही मोठ्या प्रमाणात निर्बंध लावण्यात आले होते.केवळ २५ ते ५० व्यक्तींनाच लग्नाची परवानगी देण्यात आली होती. मात्र, हे निर्बंध शिथील आहेत.

यंदा १० अधिक मुहूर्त; तुळशी विवाहानंतर सनईचे सूर दिवाळीनंतर तुळशी विवाह झाल्यावर लग्नसराईचे सनई, चौघडे वाजण्यास सुरुवात हाेईल.

नोव्हेंबर २०२१मध्ये २०, २९, ३० यानंतर डिसेंबरमध्ये १, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९ अशा तारखा आहेत. तसेच २०२२ मध्ये जानेवारीत २०, २२, २३, २७, २९,

फेब्रुवारीत ५, ६, ७, १०, १७, १९, मार्चमध्ये २५, २६, २७, २८, एप्रिल १५, १७, १९, २१, २४, २५, मेमध्ये ४, १०, १३, १४, १८, २०, २१, २२, २५, २६, २७, जून १, ६, ८, ११, १३, १४, १५, १६, १८, २२ तर जुलै महिन्यात ३, ५, ६, ७, ८, ९ अशा तारखा असून यंदा ६३ शुभ मुहूर्त लग्नासाठी आहेत.