file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने नाशिकच्या ग्रामीण भागात अक्षरशः हैदोस घातला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल १ हजार २९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे १५ तालुक्यांमध्ये पाऊस बरसला आहे. नाशिकमधील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणं भरल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे.

नाशिक शहरातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढलं आहे. रामसेतू ब्रिजपर्यंत पाणी वाढलं आहे. त्यामुळे सराफ बाजारही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली आहे. दुकानं हटवण्याची धावपळ सुरू आहे. तर प्रशासनाकडून नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात भरीव वाढ होऊन मोठा पूर येऊ शकतो. नदीकाठलगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे.

अन्य नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. आजही अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक पाण्याचा विसर्ग आज होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे गोदा घाटच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जनावरं मोकळी सोडा, बांधून ठेवू नका, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. त्र्यंबकेश्वर भागात मुसळधार पावसामुळे धोका वाढला आहे.