अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 maharashtra Politics :- “यापूर्वी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना जेव्हा जेव्हा पगारवाढ मिळाली आहे, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीच मध्यस्थी केली होती.

पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार केवळ ४५० रुपयांनी वाढला. तेव्हा अड. गुणरत्न सदावर्ते झोपले होते का?,” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनासंबंधी आमदार पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

रोहित पवार म्हणाले, “मुंबईतील सिल्व्हर ओक हे निवासस्थान म्हणजे शरद पवार यांची खासगी मालमत्ता आहे, ते सरकारी नाही.

शिवाय पवार यांच्याकडे राज्यातील सरकारमध्ये कोणतेही पद नाही. त्यामुळे त्यांच्या घरासमोर असे आंदोलन करण्याचे काहीच कारण नाही.

हे सर्व गुणरत्न सदावर्ते आणि भाजपमुळे झाले आहे. सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांची केस फुकट लढवत नव्हते. त्यासाठी सदावर्ते यांना कोट्यवधी रुपये मिळाले होते.

सदावर्ते यांनी न्यायालयाच्या निकालानंतरही एसटी आंदोलकांना भडकवणारे भाषण केले. त्यानंतरच हे आंदोलन झाले. हा सगळा घटनाक्रम पाहता यामागे सदावर्ते यांचा हात आहेच, शिवाय भाजपचाही हात असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

भाजप सरकारच्या काळातही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले, मात्र, तेव्हा देवेंद्र फडणवीस त्या बैठकीलाही गेले नव्हते. म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी असे घरावर आंदोलन केले नव्हते,” याकडे पवार यांनी लक्ष वेधले.