पुणे : मशीदीवरील भोंग्यांबाबत मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरेंची (Raj Thackeray) भूमिका आणि पुण्यात (Pune) सुरू झालेला वाद आता चांगलाच तापला आहे. यावरून आता राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी मनसेला टोला लगावला आहे.

रुपाली पाटील यांनी वसंत मोरेंची (Vasant more) राजकीय हत्या केली का ? असा थेट सवाल केला असून पुढे त्या म्हणाल्या, वसंत मोरे यांनी पाडव्यानंतर जी भूमिका घेतली ती आपण पाहिली आहे.

आपण वसंत मोरेंचं काम आपण पाहिलं आहे, ते खूप चांगलं काम करतात. त्यांना सर्व जातीपातीची लोक मतदान करतात. आज ज्या पद्धतीने ही खांदेपालट झाली आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे.

मात्र साईनाथ बाबर यांच्या प्रभागातही मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार आहे, त्यामुळे ही कुठली खेळी आहे हे कळत नाही असेही त्या म्हणाल्या आहेत. त्याचसोबत मनसेत हेच चालतं असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, ही मनसेच्या अंतर्गत खेळी आहे. वसंत मोरे यांनी आतापर्यंत चांगलं काम केलं आहे. मात्र अशाच मनसेच्या खेळींना वैतागून मी मनसे सोडली. त्यावेळी मला ते म्हणाले होते की ही राजकीय आत्महत्या आहे.

मग आज वसंत मोरेंची राजकीय हत्या केली का? असा सवाल त्यांनी केला आहे. वसंत मोरे राष्ट्रवादीत आले तर त्याचं स्वागत आहे. आमचे शहराध्यक्ष यांनीही याबाबत त्यांचं राष्ट्रवादीत स्वागत केलं आहे, कधी कधी निर्णय घ्यावा लागतो.

लोकप्रतीनीधींमध्ये निर्णय क्षमता असावी लागते. कालच वसंत मोरे यांनी निर्णय घेतला असता, तर आज ही वेळ आली नाही असेही त्या म्हणाल्या आहेत.