Maharashtra Rain : पावसाचे दमदार पुनरागमन ! कोकण, मराठवाडा व विदर्भात दमदार पाऊस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कार्यरत झाल्यामुळे राज्यात पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. शुक्रवारी मध्य महाराष्ट्र व कोकणात अनेक भागांत दमदार पाऊस पडला. तसेच मराठवाडा व विदर्भात काही भागात पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांत यलो अलर्ट असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेले दोन दिवस राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे. गुरुवारीही कोकण, मराठवाडा व विदर्भात दमदार पाऊस पडला होता. त्यानंतर शुक्रवारीही पावसाने राज्याच्या अनेक भागांत हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र व कोकणाच्या अनेक भागांत पावसाच्या जोरदार सरी पडल्या. कोकणातील काही भागांत मुसळधार पाऊस पडला.

नाशिक जिल्ह्यात दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या धरणांच्या जिल्ह्यात महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी त्याचे स्वरूप रिमझिमच्या पलीकडे गेले नव्हते. रात्रीपासून मात्र त्याने चांगलाच जोर पकडला असून, अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे जिल्ह्यात तीन जणांसह जनावरांचा मृत्यू झाला आहे.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणातून चार हजार क्युसेक या वेगाने विसर्ग करण्यात येत होता. त्यामुळे गोदावरीच्या नदीपात्रातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी लागले होते. पावसाची संततधार, तसेच धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे गोदाघाटावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.रात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेने शुक्रवारी सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. ग्रामीण भागातही पावसाने दमदार हजेरी लावली.

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

या पावसाने दारणा व नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरणही तुडुंब होण्याच्या मार्गावर असून ते शुक्रवारी सायंकाळपर्यंत ९६ टक्के भरले होते. धरणातून विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे.

कळवण तालुक्यात संततधारेने चणकापूर धरणासह लघुप्रकल्प तुडुंब झाले आहेत. चणकापूर, पुनद धरणातील पाणी गिरणा पात्रात येत असल्याने व गोदावरीत विसर्ग वाढत असल्याने नदीकाठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.