Ahmednagar News : उन्हाळा सुरू झाला असून उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत आहे. अनेक ठिकाणी उष्माघातामुळे अनेक जण आजारी पडू लागले आहेत.
सकाळची सूर्यकिरणेही प्रखर असल्याने लोकांचे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. यामुळे तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्माघात टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.
उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे डीहायड्रेशनचा धोका वाढतो. यामुळे या ऋतूत विशेष काळजी घ्यावी लागते. मग ती मुले असोत, तरुण असोत की वृद्ध. प्रचंड उष्णता, कडक सूर्यप्रकाश आणि उष्ण वारे यांमुळे उष्माघाताची शक्यता लक्षणीय वाढते,
पण योग्य काळजी घेतल्यास ‘उष्माघाताच्या त्रासापासून सुरक्षित राहता येते. खूप वेळ उन्हात काम केल्याने शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्मापात आणि उष्माघात होय.
अनेक दिवस सतत कडाक्याच्या उन्हात काम केल्यानंतर उष्मापात होतो आणि त्यातून होणारी तीव्र समस्या म्हणजेच उष्माघात होय. शरीराने मर्यादेपेक्षा जास्त निर्माण केली किंवा उष्णता शोषून घेतली तर हायपरथर्मिया म्हणजेच अतिउच्च तापमानाचा आजार होतो.
उष्माघात हा त्याचाच एक प्रकार आहे. बाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते. उष्माघात म्हणजेच होट स्ट्रोक किया सनस्ट्रोक, ही जीवघेणी अवस्था आहे. यात प्रखर तापमानाला सामोरे गेल्याने शारिरातील उष्णता संतुलन संस्था नाकाम होते.
वातावरणातील जास्त तापमान किंवा खूप वेळ उन्हामध्ये खूप शारीरिक कष्ट असलेले काम करणे किंवा अति व्यायाम करणे आणि पाणी, क्षार किंवा इतर तरल पदार्थ कमी प्रमाणात सेवन केल्याने ही परिस्थिति उद्भवते.
यातली मुख्य रोगप्रक्रिया म्हणजे अतिउष्णतेने शरीरातल्या प्रथिनांवर दुष्परिणाम होणे व पेशींमधली जीवनप्रक्रिया थांबणे. शरीरातल्या सर्व अवयवातील पेशींमध्ये हा परिणाम होतो. यात मृत्यूचे कारण बहुधा मेंदूसूज हे असते.
यामध्ये शरीराचे तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची व दगावण्याची शक्यता असते.
जास्त तापमानामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होतात. उष्माघात हा प्रामुख्याने अर्भकं, लहान मुलं, वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणाऱ्यांमध्ये आढळतो.
तसेच हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक व्याधीसारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींनाही सहज उष्माघात होऊ शकतो.
खेळाडूना आणि बराच वेळ आउटडोअर काम करणाऱ्यांना उष्मापात होऊ शकतो.
काय काळजी घ्यावी?
■ उन्हात विशेषतः दुपारी १२ ते ३ या काळात बाहेर जाणं टाळा.
■ तापमान जास्त असताना बाहेर असाल, तर थकवणाऱ्या किया वा हालचाली करू नका.
■ वेळोवेळी पाणी पित राहा. तहान लागली नाही तरीही पाणी पित राहा.
■घराबाहेर पडताना हलके, फिकट रंगाचे, सुटसुटीत सुती कपडे घाला. डोळे झाकण्यासाठी गॉगल्स, छत्री किंवा टोपी, बूट- चपला वापरा.
■अल्कोहोल, चहा- कॉफी, कार्बोनेटेड ड्रिंक्स या सगळ्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ही पेयं टाळा.
■प्रथिनांचं प्रमाण जास्त असलेलं अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका
■उन्हात काम करणार असाल तर टोपी, छत्री वापरा, ओला नॅपकिन वापरून डोकं, मान, चेहरा आणि हात-पाय पुसा.
■पार्क केलेल्या बंद वाहनांमध्ये लहान मुलं, पाळीव प्राण्यांना सोडू नका.
■तुम्हाला चक्कर येत असेल, आजारी वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
■लिंबू सरबत, ताक, फळांचा रस अशी घरगुती पेय पिणं फायद्याचं ठरेल. याने शरीरातलं पाण्याचं प्रमाण कायम राहील.
■प्राण्यांना आडोशाला ठेवा. त्यांना पुरेसं पाणी द्या.
■घर थंड ठेवण्यासाठी पडदे किंवा झडपा लावा आणि रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवा.
■पंखे, ओला नॅपकीन वापरा. थंड पाण्याने आंघोळ करा.
उष्माघात झाल्यास काय करावे?
■ व्यक्तीला थंड ठिकाणी हलवा
■ जादा कपडे काढा
■ शरीर थंड करा
■ थंड पाण्याने आंघोळ घाला
■ रीहायड्रेट होण्यास मदत करण्यासाठी त्या व्यक्तीला थंड
■पाणी किंवा इतर द्रव पदार्थ द्या.
■ वैद्यकीय मदत घ्या
उष्माघाताची लक्षणं
■ शरीराचे तापमान वाढणे
■ बदललेली मानसिक स्थिती किंवा गोंधळलेली अवस्था
■ संदिग्ध बोलणे
■ फिट येणे
■ कोरडी किंवा गरम त्वचा
■ मळमळ, उलट्या
■ हृदय गती वाढणे
■ श्वसन दर वाढणे
■ जास्त तहान लागणे
■ डोकेदुखी
■ स्नायू पेटके
■ शुद्ध हरपणे