Panjabrao Dakh Rain Prediction:- गेल्या आठवडाभराचा जर आपण विचार केला तर संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये किमान तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळाली होती. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तर पारा दहा अंशाच्या आसपास आलेला होता व प्रचंड थंडीचा कडाका जाणवू लागला होता.
परंतु मध्येच भारताच्या दक्षिण किनारपट्टी जवळ फेंगल चक्रीवादळ निर्माण झाले व कालपासून अचानक वातावरणातून थंडी गायब होऊन बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण दिसायला लागले आहे. त्यामुळे आता नक्कीच प्रश्न पडत आहे की या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्राला बसणार की नाही? याबाबत प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबरावांनी अंदाज व्यक्त केला असून त्यांच्या मते सध्या राज्यात ढगाळ वातावरण असून थंडीचे प्रमाण कमी झाले आहे.
6 डिसेंबर पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज त्यांनी वर्तवला असून शेतकऱ्यांसाठी देखील त्यांनी काही महत्त्वाचा सल्ला दिला आहे व त्यांनी म्हटले आहे की कांदा तसेच मका उत्पादक शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतमाल चांगला झाकून ठेवावा.यासोबतच राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो? याबाबत देखील त्यांनी अंदाज वर्तवला आहे.
उद्या राज्याच्या या भागात पडणार पाऊस
प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार बघितले तर उद्या म्हणजे 30 डिसेंबर रोजी राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि धाराशिव या परिसरामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून हे चक्रीवादळ येणार्या 24 तासामध्ये तीव्र होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे व यामुळे शेतकऱ्यांनी पिकांच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील पंजाबरावांनी केले आहे.
तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, वाशिम, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात पाऊस होणार आहे तर विदर्भामध्ये नागपूर, बुलढाणा आणि यवतमाळ या भागांमध्ये पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी सोलापूर,
सांगली, सातारा आणि अहमदनगर तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव तसेच जळगाव व निफाड या भागात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
आठ डिसेंबर पर्यंत ही स्थिती राहणार असून त्यानंतर मात्र राज्यातील हवामान स्वच्छ होईल व पुन्हा थंडीला सुरुवात होईल असे देखील पंजाबराव यांनी सांगितले आहे.त्यामुळे पंजाबराव डख यांच्या अंदाजावरून दिसून येते की महाराष्ट्रात देखील या चक्रीवादळाचा परिणाम पाहायला मिळणार आहे.