Maharashtra News : देशात उशिराने दाखल झालेल्या मान्सूननंतर अपेक्षेनुसार पाऊस न पडल्याने निर्माण झालेली पावसाची तूट जुलैच्या ८ दिवसांतील मुसळधार पावसाने भरून काढल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) रविवारी दिली.
मान्सूनच्या आगमनानंतर आतापर्यंत २४३.२ मिमी पाऊस झाला आहे, जो सामान्यरीत्या होणाऱ्या २३९.१ मिमी पावसापेक्षा दोन टक्के अधिक आहे. जूनच्या अखेरपर्यंत देशात १४८.६ मिमी म्हणजेच सामान्य पावसापेक्षा १० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली होती.
पण गत एका आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाची कमी भरून निघाली आहे. पण देशाच्या विविध भागांत पडलेल्या पावसाच्या प्रमाणात तफावत आहे. हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशाच्या पूर्व आणि उत्तर-पूर्व भागात १७ टक्के कमी पाऊस झाला.
तर उत्तर भारतात ५९ टक्के अधिक पाऊस पडला. मध्य भारतात सामान्यरीत्या होणाऱ्या २५५.१ मिमी पावसाच्या तुलनेत २६४.९ मिमी पावसाची नोंद झाली. तर दक्षिण भारतात पावसाची कमी ४५ टक्क्यांवरून २३ टक्क्यांवर आली आहे. हवामान विभागाने जुलैमध्ये ९४ ते १०६ टक्के दीर्घकालीन कालावधीचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता.