Havaman Andaj : गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र तसेच कोकणात हलका ते मध्यम पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी, अगदीच तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. हा जोराचा पाऊस प्रामुख्याने दक्षिण कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरावर पाहायला मिळतोय.
महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मात्र जुलै महिन्यात अजूनही चांगला जोरदार पाऊस झालेला नाही. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकरी बांधव जोरदार पावसासाठी देवाकडे साकडे घालत आहेत.
अशातच भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून आज आणि उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान आता आपण राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग होणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कुठे बरसणार धो-धो पाऊस?
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे आज दक्षिण कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सदर जिल्ह्यांना चक्क रेड अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच उत्तर कोकणातील दोन्ही जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण कोकणातील उर्वरित भागांना आज हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे. याशिवाय पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर देखील जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या संबंधित भागासाठीही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असे आयएमडीने आपल्या बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
तसेच हवामान खात्याने उद्या दक्षिण कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्रात मात्र घाटमाथ्यावरच पावसाचा जोर अधिक राहणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित भागांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय उद्या मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि कोकणातील रायगड, ठाणे जिल्ह्यासाठी IMD चा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सोबतच विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देखील आयएमडी कडून जारी करण्यात आला आहे. एकंदरीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असे म्हटले जात आहे.
मात्र सर्व दूर जोरदार पावसासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार असेच चित्र पाहायला मिळत आहे. तथापि हवामान खात्यातील काही तज्ञांनी उद्यापासून 18 जुलै पर्यंत राज्यात सर्व दूर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.