Havaman Andaj : राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वादळी पावसाने आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. वादळी पावसामुळे आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अगदी हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून अवकाळी पावसाचे हे वातावरण केव्हा मिटणार हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याच संदर्भात भारतीय हवामान खात्याचे निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी मोठी माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात वादळी पावसाचे सत्र आणखी किती दिवस सुरू राहणार या संदर्भात खुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ हवामानासहित तुरळक ठिकाणी आणखी काही दिवस किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे.
आणखी दोन दिवस अर्थातच 29 एप्रिल 2024 पर्यंत किरकोळ पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या कालावधीत काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते असे खुळे यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तेलंगानाच्या सीमावर्ती भागांमध्ये एक मे 2024 पर्यंत अवकाळी पावसाचे सावट कायम राहणार असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. मात्र मुंबईसह कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
पुढील तीन ते चार दिवस या भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहू शकते असे खुळे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या उकाड्यात वाढ होणार असे त्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे 30 तारखेपासून महाराष्ट्रातील वादळी पावसाचे सावट दूर होणार असे त्यांनी म्हटले आहे. म्हणजे अवकाळी पावसाचे सत्र 30 तारखेपासून थांबणार आहे. एकंदरीत आजपासून तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सावट कायम राहील. यानंतर मात्र अवकाळी पावसाचे वातावरण निवळणार आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आगामी काही दिवस आपल्या शेतमालाची आणि पशुधनाची विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. दरम्यान हवामान खात्याने आज राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.