Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. मात्र, आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधून पावसाचा जोर कमी होणार आहे. हवामान तज्ञांनी आजपासून पुढील चार दिवस राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहील असा अंदाज दिलाय.
आजपासून राज्यातील काही भागांमध्ये हळूहळू पावसाचा जोर कमी होत जाणार आहे. यामुळे ज्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते तेथील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
खरे तर गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील काही भागांमध्ये अक्षरशः पूरस्थिती तयार झाली आहे. नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे इत्यादी जिल्ह्यात जास्तीच्या पावसामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र राज्यातील काही जिल्ह्यात आज पासून पावसाचा जोर कमी होणार आहे.
भारतीय हवामान खात्यातील निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 27 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीत मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, धाराशिव, लातूर, परभणी, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहणार अशी शक्यता आहे.
या सदरील जिल्ह्यांमधील कमाल तापमान देखील वाढू शकते असे म्हटले जात आहे. म्हणून या भागात उन्हाचा ताप वाढण्याची शक्यता आहे. तथापि दुपारनंतर या सदर जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण तयार होईल आणि तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारून चालणार नाही असे देखील खुळे यांनी आपल्या नवीन बुलेटिन मध्ये म्हटले आहे.
उर्वरित महाराष्ट्रात मात्र म्हणजेच राज्यातील बाकीच्या 23 जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवसांच्या कालावधीत सध्या जसा पाऊस सुरू आहे तसाच पाऊस सुरू राहणार आहे. यामुळे या संबंधित जिल्ह्यातील नद्यांना पूर येऊ शकतो अशी भीती जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे सर्वसामान्यांनी या कालावधीत अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. आगामी चार दिवस राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी देखील आपल्या पशुधनाची आणि शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन कृषी तज्ञांनी केले आहे.