Maharashtra News : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. तर काही भागांत ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस वेगवेगळ्या भागात विजांच्या कडकडाटांसह पाऊस, सोसाट्याचा वारा आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.
दरम्यान, राज्यात शुक्रवारी सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे.
दक्षिण विदर्भापासून मराठवाडा ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात गेले काही दिवस पावसाला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाऊस तर काही भागात गाराही पडल्या आहेत.
मात्र, त्याचबरोबर काही भागांत उष्णतेची लाट आहे. विदर्भात उष्णतेचा कहर सुरू आहे. अनेक भागांचे तापमान ४० अंशांच्या पुढे आहे, तर मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट झाली आहे.
येत्या २० ते २३ एप्रिल दरम्यान, कोकणवगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटांसह पाऊस तर काही भागात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. त्यानंतरही तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे.
राज्यातील प्रमुख जिल्ह्यांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे ३९.५, अहमदनगर ४०, जळगाव ४३.२, कोल्हापूर ३६.६, महाबळेश्वर ३१.६, मालेगाव ४२, नाशिक ३९.४, सांगली ३७.७, सातारा ३९, सोलापूर ३८.२, मुंबई ३३.७, अलिबाग ३४, रत्नागिरी ३३.८, डहाणू ३६.३, छत्रपती संभाजीनगर ४०.९,
परभणी ४२.२, नांदेड ४१, बीड ४१.४, अकोला ४४, अमरावती ४२.८, बुलडाणा ४०.६, ब्रह्मपुरी ४३.१, चंद्रपूर ४३.८, गोंदिया ४१.१, नागपूर ४१.४, वाशिम ४३.६, वर्धा ४२.५, यवतमाळ ४२.५.