Maharashtra News : उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांना त्रास जाणवू लागला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात १३ नवीन उष्माघाताच्या रुग्णांची नोंद केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उष्माघाताच्या घटनांमध्ये १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. तसेच अद्याप मृत्यूची नोंद झालेली नाही, तरी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गेल्या दोन आठवड्यांपासून दिवसाचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उष्माघाताच्या घटनांमध्ये १५ ते २०% वाढ चिंताजनक आहे. राज्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच यंदा उष्माघाताचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी तत्काळ काळजी घेण्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. बीडमध्ये सर्वाधिक चार, तर रायगड दुसऱ्या क्रमांकावर आहे. अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, सातारा आणि धुळे येथे आतापर्यंत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
अकोल्यातील २१ वर्षीय व्यक्तीला उष्माघाताचा संशय असून उलट्या, पोटदुखी, ताप आणि अतिसार ही लक्षणे आहेत. हा रुग्ण वीटभट्टी उद्योगात काम करत होता, जेथे तापमान सामान्यतः जास्त असते. त्याला दिवसा काही तास रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि संध्याकाळी सोडण्यात आले.
एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्या विभागाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना उष्माघाताच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि लोकांना उन्हाळ्यात काय करावे आणि काय करू नये याबद्दल जागरूक करावे, असे सांगण्यात आले आहे.
उष्माघाताबरोबरच उष्णतेशी संबंधित इतर आजार आणि रुग्णालयात दाखल होण्यास मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. उष्णता, थकवा, निर्जलीकरण आणि उष्मा क्रॅम्प प्रकरणे देखील नोंदवली जात आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे उष्णतेशी संबंधित आजारांबद्दल जागरूकता वाढवणे गरजेचे आहे.
ही काळजी घ्या
नागरिकांनी उष्माघाताचा त्रास जाणवू नये म्हणून उन्हात जाणे टाळावे, उभे राहणे, जास्त पाणी प्यावे, तिखट व तेलकट पदार्थांचे सेवन कमी करणे, आहारात फळे व भाजीपाल्याचे प्रमाण वाढवणे गरजेचे असल्याचे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले.
उष्माघातामुळे एखाद्या व्यक्तीला चक्कर आल्यास तातडीने पाणी, लिंबूपाणी किंवा इलेक्ट्रॉल देण्याचे प्रयत्न करावेत. अशी व्यक्ती बेशुद्ध झाल्यास जवळच्या रुग्णालयात दाखल करणे. नागपूर किंवा अन्य अतिउष्ण ठिकाणांतील रुग्णालयांमध्ये कोल्ड स्टोअरेज वॉर्ड असतात. तसे वॉर्ड मुंबईत नसल्याने डॉक्टरांनी तातडीने अशा रुग्णांवर उपचार करणे देखील गरजेचे आहे.- डॉ. विनायक सावर्डेकर, अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय