महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यालगत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे कोकण घाटमाथ्यावर पाऊस सुरू आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रात देखील हलक्या ते मध्यम सरींचा वर्षाव सुरू आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातल्या काही भागात आणि विदर्भातील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले असून, झारखंड आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून चक्राकार वारे वाहत आहेत. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने राज्याच्या किनाऱ्यालगत पुन्हा ढग जमा होऊ लागले आहेत. मोसमी वारे लवकरच देश व्यापणार असून, देशभरात चांगल्या
पावसाची अपेक्षा आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, सांगली, सातारा येथे चांगल्या पावसाची नोंद झाली आहे तर उर्वरित महाराष्ट्रात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे.