Havaman Andaj : ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेला पाऊस राज्यात सक्रिय होऊ लागला आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागात जोरदार, तर कोकणातील काही भागांत मुसळधार पाऊस पडला.
दरम्यान, पुढील सहा दिवस राज्यातील अनेक भागात यलो अलर्ट देण्यात आला असून, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
ऑगस्ट कोरडा गेला असला तरी सप्टेंबर महिन्यात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे अरबी समुद्रात मान्सूनला अनुकूल वातावरण तयार होत आहे. त्यामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे.
३ सप्टेंबरला उत्तर बंगालच्या वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तिथेच ४८ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यात ४ सप्टेंबरपासून मुसळधार पावसाचा इशारा आहे.
शनिवारी मध्य महाराष्ट्रातील पुणे येथे ७.९, लोहगाव १८ मिमी, तर कोकण भागातील मुंबई येथे ३१ मिमी, सांताक्रुझ ०.३, रत्नागिरी २, तर डहाणू येथे १४ मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे ४ मिमी इतका पाऊस पडला. घाटमाथ्यावरही पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.
लोणावळा येथे १०५ मिमी, शिरगाव १६, शिरोटा २, ठाकूरवाडी १४, वळवण ६१, वाणगाव ७, अम्बोणे १६, भिवपुरी ५४, दावडी १३, डुंगरवाडी ३०, कोयना ७, खोपोली ८८, खंद २०, ताम्हिणी ३५, भिरा ३८ तर धारावी येथे १ मिमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात ३ व ४ सप्टेंबर रोजी,
मराठवाड्यात ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान, तर विदर्भात ३ ते ६ सप्टेंबरदरम्यान यलो अलर्ट देण्यात आला असून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणातही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.