Ahmednagar News : वातावरणातील उष्णता वाढत चालली आहे. नगर शहरात तापमान रेकॉर्डब्रेककडे चालले आहे. मंगळवारी दुपारी नगर शहराचे तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. मागील दीड महिन्यांतील सर्वाधिक उच्चांकी तापमानाची नोंद मंगळवारी झाली आहे.
दरम्यान, दुपारी चार नंतर ढगाळ वातावरणामुळे उकाडा देखील प्रचंड वाढला होता. वाढलेल्या उकाड्यामुळे नगरकर देखील हैराण झाले होते. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंदही झाली. हवामान विभागाकडून सातत्याने नगर शहरासह जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात येत होता.
त्यातच हवामान विभागातून उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत होती. पुढच्या पाच दिवसात तापमानाचा पारा ४१ अंशावर जाण्याची शक्यता असून, हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे.
उद्या यलो अलर्ट
नगर शहरासह जिल्ह्यात मंगळवारी भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला होता. बुधवार मात्र निरंक दाखवण्यात आला आहे. गुरुवारी पुन्हा पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शहरासह परिसरात मार्च महिन्यापासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत होता. मार्च महिन्यात ३१ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले होते. एप्रिल महिन्यात मात्र ३८ अंशावर तापमान गेले होते.
महिन्याभरात ७ अंशाने तापमान वाढले होते. मंगळवारी दुपारी १.१५ वाजता नगर शहराचे तापमान ३९.४३ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी नोंदवले गेले आहे. दुपारी कडक उन्हामुळे वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत होती.
चार नंतर मात्र ढगाळ वातावरणामुळे उष्णता कमी होऊन उकाडा वाढला होता. दरम्यान काही ठिकाणी वादळी वाऱ्याने हजेरी लावलेली पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी झालेल्या वादळाने शेतीपिकांचे नुकसान झाले.