Unseasonal Rain : गेल्या दोन दिवसांपासून नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या वादळी अवकाळी पावसामुळे आंब्याच्या बागासह भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले. मागील दोन महिन्यांपासून उन्हाचा पारा वाढला होता.
त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले होते; मात्र नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने काहिसा दिलासा मिळणार आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळीमुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
सोमवारी मध्यरात्री झालेल्या वादळामुळे श्रीरामपूर, राहाता तालुक्यासह अनेक भागात आंब्यांच्या बागात कैऱ्यांचा सडा पडला होता. त्यामुळे अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळात आंबा बागाच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून तात्काळ आंबा बागायतदार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. अवकाळी पावसाचा आंबा पिकावर मोठा परिणाम होत आहे. बदलत्या हवामानामुळे आंब्यावर सातत्याने बुरशीजन्य रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. तसेच अनेक भागात फळगळ झाली आहे. परिणामी ऐन हंगामात आंबा उत्पादनात घट होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस पडत आहे. काल मंगळवारी संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान तालुक्यातील अनेक भागांमध्ये विजेच्या कडकडात हलका पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे आंबा, टरबुज, खरबुज इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.
ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सतत कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागते. अवकाळी पावसाने शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
काल मंगळवारी रात्री अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तालुक्यासह इतर ठिकाणी हलका पाऊस पडला. या पावसामुळे आंबा, कांदा, खरबुज, टरबुज, भाजीपाल्यासह इतर भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे
वादळी पावसात ऐन काढणीला आलेल्या शेकडो आंब्याच्या झाडांच्या कैऱ्या खाली पडल्या. त्यामुळे येत्या बाजारात पड्या कैऱ्याची आवक वाढणार आहे. परंतु जमीनीवर आपटलेल्या कैऱ्याचे लोणचे टिकत नसल्याने ग्राहक त्यास मोठ्या प्रमाणात खरेदी करीत नाही.
तसेच वादळात खाली पडलेला आंबा पिकवण्यासाठी देखील योग्य नसतो. तो लवकर खराब होते. त्यामुळे वादळात पडलेल्या कैऱ्याची कमी दराने विक्री होते. परिणामी, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.