Maharashtra Hailstorm Alert : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे वादळी पावसासंदर्भात. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचे सावट आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस झाला आहे, काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांनी तीन-चार महिने ज्या पिकांची अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासना केली आहे ती शेती पिके वादळी पावसामुळे नेस्तनाभूत होत आहेत. काही ठिकाणी गारपिटीचे तांडव पाहायला मिळाले असल्याने फळबागांना देखील याचा मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये तुफान गारपिटीचा अंदाज दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढणार असे चित्र आहे. हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असा अंदाज कायम ठेवला आहे.
तर काही ठिकाणी तुफान गारपीट आणि वादळी पाऊस होणार असे स्पष्ट केले आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे आगामी पाच दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. या कालावधीत ठिकठिकाणी वादळी पाऊस पाहायला मिळू शकतो.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज, 24 एप्रिल रोजी राज्यातील विदर्भ विभागातील यवतमाळ, वाशीम, चंद्रपूर या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह गारपीट आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अर्थातच या ठिकाणी तुफान वादळी पाऊस आणि गारपिट होण्याची शक्यता आहे परिणामी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिक सावध राहणे अपेक्षित आहे.
तसेच, आज धाराशिव, हिंगोली, बीड, परभणी, सोलापूर, सांगली, नगर जिल्ह्यात देखील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह गारपीट आणि वादळी पाऊस होणार असा अंदाज IMD ने जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
अर्थातच यवतमाळ, वाशिम आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांच्या तुलनेत या सात जिल्ह्यांमध्ये पावसाचा तथा गारपिटीचा जोर कमी राहणार आहे. मात्र असे असले तरी वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता लक्षात घेता येथील शेतकऱ्यांनी देखील आपल्या शेतीमालाची आणि पशुधनाची काळजी घेणे अपेक्षित आहे.
विशेष म्हणजे हवामान खात्याने या 10 जिल्ह्यांसोबतच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. मात्र मुंबईसह दक्षिण कोकण आणि उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.
अर्थातच कोकण वगळता राज्यातील इतर विभागांमध्ये आगामी काही दिवस वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेश विभागातील काही जिल्ह्यांमध्ये रविवार पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.