वादळी पावसाचा मुक्काम वाढला ! महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस सूरु राहणार वळवाचा पाऊस, हवामान खात्याचा नवीन अंदाज जाहीर

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रातील हवामानातं सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत. हवामानात होत असलेल्या अमूलाग्र बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, या नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली.

जानेवारीपासून प्रत्येक महिन्याला वादळी पावसाची हजेरी लागली आहे. गेल्या महिन्यातही अवकाळी पाऊस झाला आणि या चालू महिन्यात देखील वळवाचा पाऊस राज्यभर थैमान माजवत आहे. गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून महाराष्ट्रात ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे.

काल राज्यातील अनेक भागात कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक नोंदवले गेले आहे. महाराष्ट्रातील मालेगावात तर 43 अंश सेल्सिअस पेक्षा अधिकच्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

दुसरीकडे राज्यातील काही भागात वळवाचा पाऊस सुरूच आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये काल जोरदार वादळी पावसाची हजेरी लागली. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी पाऊस पाहायला मिळाला आणि यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अशातच भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस महाराष्ट्रात असेच हवामान कायम राहणार असा अंदाज यावेळी दिला आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तथा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे.

धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आज वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर या सदर जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्यामुळे या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिक सावध आणि सजग राहण्याचा सल्ला यावेळी जाणकार लोकांनी दिला आहे. वादळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची देखील विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे.

तसेच भारतीय हवामान खात्याने उद्या अर्थातच 21 एप्रिल 2024 ला राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. शिवाय सोमवारी म्हणजे 22 तारखेला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आले आहे.

एवढेच नाही तर 23 तारखेला अर्थातच मंगळवारीही राज्यात ठिकठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाकडून यावेळी जारी करण्यात आला आहे. एकंदरीत आगामी चार दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe