Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसत आहे. राज्यात 15 ऑगस्ट नंतर पावसाला सुरुवात झाली. पहिल्या पंधरवड्यात सुरुवातीच्या टप्प्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दुसऱ्या पंधरवाड्यात पावसाने खऱ्या अर्थाने धुमाकूळ घातला आहे.
सर्वत्र जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस होत आहे. यामुळे धरणांमधील पाण्याची आवक जलद गतीने वाढत असून राज्यातील काही प्रमुख धरणांमधून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
त्यामुळे नदीनाल्याला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जास्तीच्या पावसामुळे काही ठिकाणी सर्वसामान्य जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पावसाचा शेतकऱ्यांच्या शेती पिकांना देखील मोठा फटका बसत आहे.
जास्तीच्या पावसामुळे शेती पिके खराब होऊ लागली आहेत, पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच भारतीय हवामान खात्यातील निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी राज्यातील पावसासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे.
खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे आज आणि उद्या राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन देखील खुळे यांनी केले आहे.
जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज तारीख 25 ऑगस्ट आणि उद्या 26 ऑगस्ट रोजी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
या कालावधीत खानदेशातील तिन्हीच्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित 14 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी यासंबंधीत जिल्ह्यातील नागरिकांनी आज आणि उद्या अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.