गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात अवकाळी पावसाची तुफान बॅटिंग, ‘या’ 3 जिल्ह्यात झाला गारांचा पाऊस, शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट !

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Rain

Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे. कुठे विक्रमी तापमानाची नोंद होत आहे तर कुठे वादळी पावसाची हजेरी लागत आहे. एकंदरीत राज्यात संमिश्र वातावरण तयार झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य जनता देखील अडचणीत आली आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलय. काल-परवापासून विदर्भातील काही भागातील तापमान काहीसे कमी झाले आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरू आहे. ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तसेच काही भागात झालेला वादळी पाऊस यामुळे तापमान काहीसे ओसरले आहे. तथापि तापमान 40°c च्या आसपासच असल्याने सर्वसामान्य जनता घामाघुम होत आहे.

राज्यात तापमानाचा पारा विक्रमी पातळीवर पोहचला अन हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज जारी केला. हवामान खात्याने राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली. 12 एप्रिल पर्यंत अर्थात शुक्रवार पर्यंत राज्यात वादळी पाऊस सुरू राहणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.

यानुसार आता राज्यात पावसाला सुरुवात देखील झाली आहे. अर्थातच महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या महिन्यात अर्थातच मार्च महिन्यात देखील राज्यात वादळी पाऊस झाला होता तसेच काही ठिकाणी गारपीट झाली होती. दरम्यान आता एप्रिल महिन्यातही तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

राज्यातील खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज गुढीपाडव्याच्या दिवशी अवकाळी पावसाने दणका दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला जाणार अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील वर्धा, अमरावती आणि खानदेशातील जळगाव या तीन जिल्ह्यात अवकाळी पावसाचा त्राहिमाम पाहायला मिळाला असून काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस झाला होता.

मध्यरात्री जिल्ह्यातील काही भागात गारपीट देखील झाली. यानंतर आज गुढीपाडव्याच्या दिवशी अगदी सकाळीच पावसाची हजेरी पाहायला मिळाली. काही ठिकाणी सूर्योदय झाले अन काही ठिकाणी वरुणराजाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

अगदी हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाल्याच चित्र पाहायला मिळालं. दुसरीकडे विदर्भातील अमरावती जिल्ह्यात देखील वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात आज सकाळी गारपीट झाली अन वादळी वारा वाहत होता. परिणामी तालुक्यातील गहू, संत्रा, कांदा अशा विविध पिकांचे नुकसान झाले असून यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात आले आहे. थुगाव आणि पिपरीमध्ये गारपीट झाल्याची माहिती मिळाली असून या भागातील संत्रा, गहू, कांदा उत्पादकांना याचा मोठा फटका बसला आहे.

जळगाव जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर येथील जामनेर तालुक्यात पावसाची हजेरी पाहायला मिळाली. यामुळे तालुक्यातील गहू आणि हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले असून इतरही पिकांना याचा फटका बसला आहे. या वादळी पावसामुळे उकाड्याने हैरान जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. पण यामुळे शेतकऱ्यांनी केलेली मेहनत पाण्यात गेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe