Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. हा पूर्व मौसमी पाऊस राज्यातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान होत आहे शिवाय आगामी खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी करण्यात देखील मोठा व्यत्यय येत आहे.
यामुळे शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत. परिणामी, शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. दुसरीकडे मान्सून संदर्भात एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. भारतीय हवामान खात्याने 19 तारखेला मान्सूनचे अंदमानत आगमन झाले असल्याचे जाहीर केले आहे.
एवढेच नाही तर केरळात मानसून 31 मे च्या सुमारास दाखल होणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे 28 मे ते 3 जून या कालावधीत केरळमध्ये मान्सून आगमनाची शक्यता आहे.
राज्यातील मान्सून आगमना बाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्रात मान्सूनचे जूनच्या पहिल्या आठवड्याचा शेवटी आगमन होण्याची शक्यता आहे.आठ ते नऊ जून च्या दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होऊ शकते असे म्हटले जात आहे.
महाराष्ट्रात मान्सून आधी तळ कोकणात दाखल होईल. यानंतर मुंबईत जाईल आणि मग संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. 15 जून 2024 पर्यंत मानसून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी माहिती हवामान खात्याकडून समोर येत आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे मागील दोन दिवसांपासून मान्सून अंदमानातच पाहायला मिळत आहे. पण, माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून पुढील दोन दिवसांमध्ये माॅन्सून आणखी पुढे वाटचाल करण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस सुरू आहे. आज देखील वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. एवढेच नाही तर दक्षिण कोकणात देखील काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
मात्र कोकणातील काही भागात उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. फक्त आजच नाही तर उद्या आणि परवा देखील महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात उद्या आणि परवा वादळी पाऊस पाहायला मिळू शकतो असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.