Maharashtra Rain : गेल्या एप्रिल महिन्यात वादळी पावसाने मोठा धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या चालू महिन्यात वादळी पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच मात्र भारतीय हवामान विभागाचा एक नवीन अंदाज समोर आला आहे.
हवामान खात्याने महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल झाला असून यामुळे राज्यात वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे आगामी काही दिवस राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.
सहा मे 2024 ते 9 मे 2024 या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला असून यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
आयएमडीने मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, सध्या चक्राकार वाऱ्याची स्थिती उप हिमालय पश्चिम बंगालकडून मराठवाड्यावर सक्रीय आहे.
परिणामी इशान्य भारतासह मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता आहे. पण, येत्या 24 तासात अनेक ठिकाणी तापमानात चार ते पाच अंश सेल्सियस ची वाढ देखील होणार आहे.
खरे तर सध्या उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये तापमानात वाढ होत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील मालेगावात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे.
IMD ने ठाणे, रायगड, रत्नागिरी. सिंधुदूर्ग भागात उष्ण व आर्द्र हवामानाचा यलो अलर्ट दिला आहे. पार्श्वभूमीवर सदर जिल्ह्यातील नागरिकांना विशेष सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उष्णतेपासून स्वतःचा बचाव करावा असे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे, उद्यापासून मराठवाड्यातील नांदेड, लातूर तर विदर्भ विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
यावेळी वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास राहणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार असे आय एम डी ने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.