Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे. रखरखत्या उन्हात पुन्हा एकदा अवकाळीचे सत्र सुरू झाले आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअस पार पोहोचले आहे. दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे उकाड्याने हैरान जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होणार आहे.
राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागातील काही भागांमध्ये सध्या स्थितीला हळद काढणीची कामे सुरू आहेत. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कांदा काढणी सुरू आहे. अशा या परिस्थितीत जर वादळी पाऊस बरसला तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे.
दरम्यान हवामान खात्याने शुक्रवार पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज दिला आहे. त्यामुळे आज आपण नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे ? याविषयी हवामान खात्याने दिलेली माहिती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोण-कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार अवकाळी
8 एप्रिल : आज अर्थातच आठ एप्रिलला राज्यातील सर्व विभागातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, अकोला या जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय. एवढेच नाही तर मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.
9 एप्रिल : उद्या अर्थातच 9 एप्रिलला विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, अकोला या अकरा जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी या चार जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
तसेच मराठवाड्यातील बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावणार असे बोलले जात आहे.
10 एप्रिल : 10 एप्रिलला अर्थातच बुधवारी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, अकोला या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्याबाबत बोलायचं झाल्यास येथील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील या संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील जळगाव, सातारा, पुणे मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जेनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
11 एप्रिल अन 12 एप्रिल : 11 एप्रिलला अर्थातच गुरुवारी आणि 12 एप्रिलला म्हणजे शुक्रवारी राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.