मान्सूनची आगेकूच सुरू असून, त्याने देशाचा बहुतांशी भाग व्यापला आहे. शनिवारी (२९ जून) मान्सून उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागांत पोहोचला. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर वाढला असून, पुढील ४ दिवस राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून राजस्थानचा आणखी काही भाग, हरयाणाचा उर्वरित भाग, जम्मूचा उर्वरित भाग व्यापणार आहे. राज्याच्या काही भागांत सध्या पाऊस पडत आहे.
शनिवारी सायंकाळपर्यंत पुणे, जळगाव, महाबळेश्वर, सातारा, मुंबई, सांताक्रूझ, रत्नागिरी, डहाणू, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यवतमाळ येथे पावसाची नोंद झाली.
रविवार, ३० जून ते बुधवार, ३ जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यांवर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. किनारपट्टीवर वारे वाहणार आहेत. विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.