Monsoon 2024 : बळीराजा गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची वाट पाहत आहे. सध्या राज्यासह देशभरातील शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिक पेरणीसाठी आवश्यक असलेल्या पूर्व मशागतीच्या कामात गुंतलेले आहेत. तसेच बी-बियाण्यासाठी आणि खतांच्या खरेदीसाठी देखील शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे.
भारतीय हवामान खात्याने 19 मे ला मान्सूनचे अंदमानात आगमन झाल्याचे जाहीर केल्यापासूनचं शेतकऱ्यांच्या शेती कामांना वेग आला आहे. अंदमानात दाखल झाल्यानंतर मान्सूनने आतापर्यंत बराचसा भाग काबीज केला आहे.
आयएमडी कडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत निम्मे बंगाल उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भूभाग दोन मान्सून हिश्शाने काबीज केला आहे.
तसेच, आगामी काळातही मान्सूनसाठी अशीच अनुकूल परिस्थिती राहिली तर मान्सूनचे आगमन लवकरच भारताच्या मुख्य भूमीत होणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. भारताच्या मुख्य भूमीत अर्थातच केरळमध्ये मान्सून ३१ मे च्या सुमारास दाखल होणार असा अंदाज आहे.
तसेच महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत अर्थात तळकोकणात मानसून आठ जूनच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे. नंतर तो राजधानी मुंबईत सलामी देणार आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात 10 जूनला मान्सून सक्रिय होणार असा अंदाज आहे.
तसेच, १५ जूनच्या आसपास कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भात मान्सून दाखल होऊ शकतो असे म्हटले जात आहे.
तसेच यंदा मान्सूनसाठी आणखी एक पोषक परिस्थिती तयार होत आहे. ती म्हणजे मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकर सक्रिय होणार असा एक अंदाज तज्ञ लोकांनी व्यक्त केला आहे.
जर बंगाल शाखा लवकर सक्रिय झाली तर सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी व लगतच्या जिल्ह्यांमध्ये मध्य महाराष्ट्र व खान्देशपेक्षा लवकर मान्सून आगमन होणार असे बोलले जात आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. मात्र या रेमल चक्रीवादळाचा मान्सूनवर तथा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नसल्याचे बोलले जात आहे. अर्थातच मान्सूनचा प्रवास चक्रीवादळामुळे बाधित होणार नाही अशी शक्यता आहे.
निश्चितच असे झाले तर मान्सून आपल्या नियोजित वेळेत दाखल होणार आहे. यामुळे राज्यासहित देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि शेती कामांना वेग येईल अशी आशा आहे.