Monsoon 2024 : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून 2024 चा आपला पहिला अंदाज जारी केला आहे. खरे तर भारतीय हवामान विभाग हा अंदाज केव्हा जारी करणार याबाबत सातत्याने शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
अखेर कार काल अर्थातच 15 एप्रिलला हवामान खात्याने मान्सूनचा पहिला अंदाज देशापुढे मांडला आहे. यामध्ये यंदा सरासरी ते त्याहून अधिक म्हणजे 106% पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यंदा पावसाळी काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये ९१.५ सेंटीमीटर पाऊस पडणार असे या पहिल्या अंदाजात म्हटले गेले आहे.
खरेतर या कालावधीत दरवर्षी 87cm एवढा पाऊस पडतो. म्हणजे यंदा पावसाळ्यात जास्तीचा पाऊस पडणार आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहणार नाही.
तर ला निनाचा प्रभाव राहील.
जुलै अखेरपर्यंत ला निना सक्रिय होईल. यामुळे ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची तीव्रता वाढणार असा अंदाज आहे.या कालावधीत दमदार पाऊस होणार असे आय एम डी ने म्हटले आहे. मात्र असे असले तरी देशातील काही राज्यांमध्ये यंदा कमी पाऊस पाहायला मिळू शकतो असे आयएमडीने म्हटले आहे.
कुठे पडणार कमी पाऊस ?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशातील जम्मू-काश्मीर, लद्दाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम, ओडिषा, छत्तीसगड, प. बंगाल व झारखंड या राज्यांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आपल्या महाराष्ट्रात मात्र यंदा मान्सून काळात चांगला पाऊस होणार आहे. राज्यात सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सूनच आगमन केव्हा होणार ?
यंदा मान्सून वेळेवर येण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन 15 मे 2024 पर्यंत होऊ शकते असे हवामान खात्याने म्हटले आहे. तसेच आठ जूनला मान्सून आपल्या राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी सात जूनला मान्सूनचे तळ कोकणात आगमन होते.तळ कोकणात मान्सून दाखल झाल्यानंतर मानसून संपूर्ण महाराष्ट्र व्यापत असतो. यंदा वेळेवर मान्सून दाखल होणार असा अंदाज असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान पाहायला मिळत आहे.