Monsoon Good News :- यावर्षी केरळात उशिराने मान्सूनचे आगमन झालेले होते व त्यामुळे महाराष्ट्रात देखील मान्सून लांबणार अशा पद्धतीची साधारण चर्चा होती. परंतु 11 जून रोजी राज्यात मान्सूनने हजेरी लावली होती. त्यानंतर मध्यंतरीच्या कालावधीमध्ये बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून वर परिणाम झाला व काहीसा मान्सूनचा प्रवास रखडल्याचे दिसून आले. त्यानंतर हवामान विभागाने 23 जून रोजी राज्यात आगमन होणार असल्याचे सांगितले होते.
जर आपण शेतकऱ्यांचा विचार केला तर खरीप हंगामासाठी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना पावसाचे नितांत गरज असून लवकर पाऊस जर पडला नाही तर ज्या काही थोड्या प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत ती पिके देखील वाया जाण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मान्सून विषयी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विदर्भात मान्सूनचे आगमन
राज्यातील काही भागात आजपासून मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून विदर्भातील नागपूर व मराठवाड्यातील तसेच मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये आज सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला असून असह्य झालेल्या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच विदर्भातील अमरावती जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून अमरावती जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप सुखद धक्का बसला आहे.
एवढेच नाही तर पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या असून नागपूर तसेच मराठवाड्यातील नांदेडमध्ये देखील हलका पाऊस झाला आहे. आज संपूर्ण राज्यांमध्ये वातावरणात बदल पाहिला मिळत असून ढगांची दाटी झाल्याचे सध्या चित्र आहे. उशिरा का होईना राज्यातील काही भागांमध्ये आज मान्सून दाखल झालेला असल्यामुळे काहीसा दिलासा मिळताना दिसून येत आहे. परंतु खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून पेरणीसाठी संपूर्ण महाराष्ट्राला जोरदार पावसाची गरज आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांच्या स्थितीमुळे मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा अधिक मजबूत होत होत आहे.
हवामान विभागाचा पुढील चार आठवड्यांचा सुधारित अंदाज
स्थानिक वातावरण आणि बाष्पयुक्त ढगांची दाटी झाल्याचा परिणाम म्हणून विदर्भ आणि संबंधित भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला असून त्यांनी म्हटले की हवामान विभागाने गुरुवारी चार आठवड्यांचा सुधारित अंदाज जाहीर केला आहे.
या अंदाजानुसार 23 जून ते 20 जुलै या काळामध्ये संपूर्ण देशात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज असून 23 जून पासून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मध्यभारतात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जुलै च्या दुसऱ्या आठवड्यात मोसमी पाऊस भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय राहण्याची शक्यता असून सध्या मोसमी पावसाच्या वाटचालीस पोषक हवामान आहे. राज्यामध्ये मोसमी वाऱ्यांनी वाटचाल केली नसली तरी कोकणामध्ये पावसाचा जोर काहीसा वाढला असून येणाऱ्या दोन ते तीन दिवसात राज्याच्या काही भागात पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे.