राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून, मंगळवारी मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत दमदार पाऊस पडला. तसेच कोकण, मराठवाडा, विदर्भातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा यलो व ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, मान्सूनने मंगळवारी संपूर्ण देश व्यापला आहे. त्यामुळे राज्यातही पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मान्सूनने राजस्थान, हरयाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागात दाखल होऊन संपूर्ण भारत व्यापला आहे. पश्चिम राजास्थानच्या भागांमध्ये प्रवेश करीत मान्सून सर्वसाधारणपणे ८ जुलैला संपूर्ण देश व्यापत असतो.
यंदा सहा दिवस आधीच मान्सूनने संपूर्ण देश व्यापला. केरळपासून पश्चिम राजस्थानचा भाग व्यापण्यासाठी मान्सूनला यावर्षी ३३ दिवसांचा कालावधी लागला. ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. गेल्या २४ तासांत राज्यात पावसाचा जोर वाढला असून, बहुतांश भागात चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे.
समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीपर्यंत कायम आहे. पण अजूनही बहुतांशी भागात मान्सून म्हणावा तसा सक्रिय झालेला नाही. राज्यात मंगळवारी विविध भागांत पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील सातारा येथे ५० मि.मी. इतका मुसळधार पाऊस पडला आहे.
तसेच महाबळेश्वर, पुणे, लोहगाव, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सोलापूर येथे पावसाने हजेरी लावली. कोकणातील मुंबई, रत्नागिरी, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ येथे पाऊस पडला.
येत्या ३ ते ६ जुलैदरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रात औरंज व यलो अलर्ट असून, काही भागांत मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.