Monsoon News : भारतीय हवामान खात्याने 19 मे रोजी मान्सूनचे अंदमानातं आगमन झाल्याचे स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे मान्सून अंदमानात पोहोचल्यानंतर त्याचा पुढील प्रवास देखील जलद गतीने सुरू होता. दरम्यान भारतीय हवामान खात्याने 31 मेला मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार असे जाहीरही केले होते.
मात्र प्रत्यक्षात मान्सून केरळमध्ये लवकरच पोहोचला आहे. हवामान खात्याने जाहीर केलेल्या तारखे आधीच मान्सून केरळमध्ये येऊन धडकला आहे. यामुळे सबंध देशभरात आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी बांधवांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.
अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहणाऱ्या बळीराजाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान खात्याने आज 30 मे ला मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे.
विशेष म्हणजे फक्त केरळच नाही तर ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये मान्सूनने आगेकूच केली आहे. आता मान्सून केरळमध्ये पोहोचला असल्याने महाराष्ट्रात कधी दाखल होणार हा देखील सवाल उपस्थित होत आहे.
महाराष्ट्रात कधी पोहोचणार मान्सून
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सूनसाठी खूपच पोषक परिस्थिती आहे. दरम्यान मान्सूनसाठीची पोषक परिस्थिती आणि त्याचा वेग पाहता आता येत्या दहा दिवसांनी तो आपल्या महाराष्ट्रात दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
खरेतर रेमल चक्रीवादळामुळे केरळच्या दिशेने येणाऱ्या मान्सूनवर परिणाम होणार अशी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे चक्रीवादळ मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक ठरले आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मानसून केरळमध्ये नेहमीच्या तारखेच्या 2 दिवस आधीच दाखल झाला आहे. दरवर्षी मान्सून केरळमध्ये एक जूनला दाखल होत असतो. यंदा मात्र तो 30 मे 2024 ला दाखल झाला आहे.
आता मान्सून टप्प्याटप्प्यानं पश्चिम किनारपट्टीवरून पुढे सरकणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या आठवड्यात किंवा येत्या दहा दिवसांनी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम मान्सून तळ कोकणात दाखल होणार आहे.
यानंतर तो मुंबईकडे जाईल आणि मग 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज आहे. आय एम डी ने यंदाच्या जून महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा काहीसा कमी राहणार असे म्हटले आहे. पण, तरीही संपूर्ण मोसमात मात्र तो सामान्यहून अधिक बरसणार आहे.