Monsoon Update : मागील वर्षी पावसाचे प्रमाण फारच कमी राहिले. पाणलोटातही पाऊस फारच कमी झाला. त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश भागात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
भारतातील नद्यांच्या स्थितीबाबत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात महत्त्वाच्या नद्यांमध्ये ४० टक्के पाण्याचे प्रमाण असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अनेक नद्या कोरड्या पडल्या आहेत. दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या राज्यासाठी मार्च महिन्यातच दिलासादायक बातमी आली आहे.
स्कायमेटने यंदाच्या पावसाचा अंदाज वर्तवला असून दुष्काळासाठी कारणीभूत असलेल्या अल निनोचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. आता त्याची जागा ला निना घेणार असल्याने भारतीय उपखंडाला याचा प्रचंड फायदा होईल.
या बदलत्या स्थितीचा फायदा मान्सून वेळेत दाखल होण्यात होईल असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. दरम्यान अल निनोच्या संपुष्ठात येण्याचा परिणाम सुरवातीच्या काळात मान्सूच्या आगमनावर जाणवेल. परंतु पावसाळ्याचा दुसरा टप्पा मात्र उत्तम असणार आहे.
सरासरीच्या १०२ टक्के पाऊस..
जून ते सप्टेंबर या महिन्यात मान्सून सरासरीच्या १०२ टक्के पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. अल निनोच्या जाण्याच्या प्रभावामुळे मान्सूनचे आगमन काहीसे लांबेल असेही म्हटले आहे.त्यामुळे मागील वर्षीपेक्षा यंदा चांगला पडेल असे चित्र असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पुरेसा पाऊस
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये पुरेसा पाऊस पडेल. बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जुलै आणि ऑगस्टच्या काळात कमी एवूस असेल अंदाज वर्तवण्यात आला आहे.अल निनो वरून ला निनामध्ये रुपांतरीत होताना हंगामाची सुरुवात विस्कळीत असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अल निनो म्हणजे काय?
पूर्व प्रशांत महासागरातील पाण्याचा वरचा थर तापतो त्याला अल निनो असे म्हणतात. हा हवामानाचा ट्रेंड दर काही वर्षांनी एकदा येत असतो असे तज्ज्ञ म्हणतात. मागील 65 वर्षांत 14 वेळा प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय झालेला असून त्यापैकी 9 वेळा भारतात दुष्काळ पडला होता असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.