हवामान

Monsoon Update: महाराष्ट्रामध्ये मान्सून वेळेच्याआधी झाला दाखल! पण कोणत्या कारणाने मंदावली वाटचाल? केव्हा बरसणार चांगला पाऊस?

Published by
Ajay Patil

Monsoon Update:- यावर्षी जर आपण एकंदरीत भारतातील मान्सूनचे आगमन पाहिले तर ते खूपच समाधानकारक राहिल्याचे दिसून आले. अंदमान निकोबार पासून तर केरळ आणि महाराष्ट्रात मान्सून वेळेआधी दाखल झाला. तसेच यावर्षी हवामान खात्याच्या माध्यमातून अंदाज वर्तवण्यात आला आहे की पाऊस यावर्षी अपेक्षेपेक्षा जास्त राहणार.

तसेच महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली व खरिपाच्या पेरण्यांना देखील वेग आल्याचे चित्र आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून जर आपण पाहिले तर मान्सूनची वाटचाल मात्र मंदावल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता अनेक तर्क वितर्कना पेव फुटल्याचे आपल्याला दिसून येत आहे. अजून देखील अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्र हा कोरडाठाक आहे. त्यामुळे मोसमी पावसाची वाटचाल मंदावली व ती का मंदावली हा प्रश्न अनेक जणांना पडलेला आहे.

 महाराष्ट्रामध्ये मान्सूनची वाटचाल का मंदावली?

यावर्षी अंदमान निकोबार बेट समूहावर वेळेआधी पाऊस दाखल झाला व त्यानंतर वेळेच्या आधी केरळमध्ये मान्सूनची एन्ट्री झाली. एवढेच काय तर महाराष्ट्रात देखील निर्धारित वेळेपेक्षा लवकर मान्सूनने एन्ट्री केली. महाराष्ट्रातील पुणे तसेच मुंबई व कोल्हापुरामध्ये मोसमी पाऊस दाखल झाला व विदर्भातील यवतमाळ तसेच अमरावती व अकोला,

या ठिकाणी देखील मोसमी पाऊस दाखल झाला आहे. या सगळ्याच ठिकाणी वेळेच्या आधी मोसमी पाऊस दाखल झाल्यामुळे तो आता येणाऱ्या काही दिवसात संपूर्ण राज्य व्यापणार अशी  शक्यता वाटत होती. परंतु सध्या मोसमी पावसाची वाटचाल मंदावल्याचे दिसून येत आहे व या मोसमी पावसाची केवळ अरबी समुद्रीय शाखा तेवढी महाराष्ट्रात पुढे सरकत आहे तर बंगालच्या उपसागराची शाखा मात्र स्थिरावली आहे.

या कारणामुळे राज्यांमध्ये सध्या मोसमी पावसाची वाटचाल मंदावल्याची स्थिती आहे. जर सध्याचे भौगोलिक परिस्थिती पाहिली तर मोसमी वाऱ्यांची प्रगती होण्याकरिता आणखी चार ते पाच दिवस वाट पाहावी लागणार आहे. सध्या तरी मोसमी पावसासाठी विशेष अशी कोणत्याही प्रकारची तीव्र स्वरूपातील वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रासाठी जाणवली नसून त्यामुळे महाराष्ट्रात मानसून थबकल्याचे चित्र आहे.

 मोसमी पावसाचा कालावधी बदलला का?

जेव्हा मोसमी पाऊस देशाच्या विविध भागांमध्ये दाखल होतो त्या अगोदर पूर्व मोसमी पाऊस दाखल होत असतो व त्यानंतर अवकाळी पाऊस देखील सुरूच असतो. साधारणपणे हे चक्र आपल्याला संपूर्ण वर्षभर दिसून येते. यावर्षी देशाच्या बऱ्याच भागांमध्ये आपल्याला वर्षभर अवकाळी पाऊस दिसून आला. परंतु मोसमी पावसाचा कालावधी अधिक महत्त्वाचा समजला जातो.

कारण याच पावसावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे गणित अवलंबून असते. जर आपण मोसमी पावसाचा कालावधी बघितला तर तो जून ते सप्टेंबर हा असून गेल्या काही वर्षातील चित्र पाहिले तर मात्र हा कालावधी संपून गेल्यानंतर देखील मोसमी पावसाचे चक्र सुरूच असल्याचे आपल्याला दिसून आले आहे. मोसमी पाऊस उशिरा दाखल होणे तर कधी उशिरापर्यंत मुक्काम ठोकणे असा मोसमी पावसाचा कालावधी सध्या बदलताना दिसून येत आहे.

 अजून चार ते पाच दिवस करावी लागणार मोसमी पावसाची प्रतीक्षा

सध्या मराठवाड्यात आणि संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मोसमी पाऊस पोहोचला आहे. परंतु खानदेश तसेच पूर्व विदर्भात मात्र अजून देखील पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सगळ्या परिस्थितीत अजून चार ते पाच दिवस मोसमी वाऱ्याच्या प्रगतीसाठी वाट पाहावी लागणार आहे. सध्या तेलंगणा तसेच छत्तीसगडच्या आणि गुजरातच्या काही भागात मोसमी पाऊस दाखल झाला आहे. येणाऱ्या चार ते पाच दिवसात मोसमी पाऊस ओडिशा तसेच महाराष्ट्र, छत्तीसगड व किनारी आंध्र प्रदेश येथे दाखल होईल अशी शक्यता आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil