Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या काही तासांपासून महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकणातील काही भागांमध्ये अति मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. कोकणाच्या तुलनेत विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. विदर्भातील अमरावती आणि नागपूर मध्ये पावसाची तीव्रता फारच अधिक असून या ठिकाणी झालेल्या अति मुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे.
विशेष बाब अशी की भारतीय हवामान खात्याने या भागांमध्ये आणखी काही तास जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. जवळपास पुढील दोन दिवस या भागांमध्ये असाच मुसळधार पाऊस सुरू राहणार असे आयएमडीने सांगितले असून या पार्श्वभूमीवर या सदर भागांसाठी रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात 30 जुलै पर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रातील ज्या गावात अजून पर्यंत पाऊस झालेला नाही तिथे देखील या कालावधीत पाऊस पडणार आहे.
राज्यात 20 जुलैपासून पावसाला सुरुवात होईल आणि पुढील दहा दिवस म्हणजेच 30 जुलै पर्यंत पावसाचा मुक्काम राहणार असा अंदाज त्यांनी यावेळी सार्वजनिक केला आहे.
21, 22, 23, 24 जुलैला राज्यातील अनेक भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या काळात रिमझिम पाऊस पडेल अन रिमझिम पाऊस पडत असतानाच पावसाचा जोर वाढणार असे पंजाबरावांचे म्हणणे आहे.
या कालावधीत राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे.
मात्र मुंबईत आणि उत्तर महाराष्ट्रात या कालावधीत पावसाचा जोर अधिक राहणार आहे. मुंबई सह कोकणात या कालावधीत चांगला जोरदार पाऊस पडू शकतो असे पंजाबरावांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता पंजाबरावांचा हा हवामान अंदाज कितपत खरा ठरतो हे पाहण्यासारखे राहणार आहे.
तथापि पंजाब रावांनी पुढील काही दिवस राज्यात रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भरचं पडणार आहे. याचे कारण असे की राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
रिमझिम पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळणार आहे मात्र विहिरींना पाणी उतरणार नाही. यामुळे जोरदार पाऊस व्हावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.