हवामान

Maharashtra Rain : पावसाळा लांबणीवर पडला ? पावसाचे संकेत देणारे पक्षीही गायब !

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Rain : पाऊस येणार असल्याची वर्दी आपल्याला निसर्गातल्या ज्यांच्याकडून मिळते त्यापैकी एक महत्वाचा घटक म्हणजे पक्षी. आपल्या परिसरात असणाऱ्या विविध पक्षांना हवामान बदलाचे ज्ञान असते.

पाऊस, नैसर्गिक आपत्ती, त्सुनामी, यासारख्या घटनांची माहिती आपणास पक्षांच्या वर्तणुकीत होणाऱ्या बदलांवरून लक्षात येते. पक्षांना पावसाचा तंतोतंत अंदाज कळतो. त्यानुसार ते आपली तजवीज करतात.

कावळ्याने जाड फांदीवर घरटे केल्यास पाऊस जोरदार व वादळी वाऱ्यासह होणार, जेव्हा झाडाच्या शेंड्यावरील फांदी वर घर बांधतो तेव्हा पाऊस कमी होणार असल्याचा त्याला अंदाज आलेला असतो.

पावसाचा अंदाज हवामान खाते वर्तवते, पण त्यापेक्षा पारंपरिक आडाख्यावरून बांधला जाणारा मान्सूनचा अंदाज अधिक खरा ठरतो. मान्सूनच्या पहिल्या पावसाचे आगमन जवळ आल्याची सर्वात मोठी खूण म्हणजे पावश्या पक्षी.

पावश्या व पावसाचे अतूट नाते आहे. तो येतानाच पावसाची वर्दी घेऊन येतो, म्हणून शेतकरी पावशाची आतुरतेने वाट पाहतात. तो ओरडताना पेरते व्हा पेरते व्हा असा आवाज करतो. पावसाची आगमनाची सूचना देणारे चातक पक्षी आफ्रिकेतून स्थलांतर करीत भारतात प्रवेश करतात.

पीक पीक, असा आवाज करत ते पावसाच्या आगमनाची चाहूल देतात. त्यांच्या आगमनाबरोबरच पावसाचे आगमन होते. यंदा मात्र चातक, पावश्या, या पक्षांची चाहूल दिसत नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत.

ऑगस्ट महिन्यातील एक आठवडा संपला तरी मोठ्या पावसाचे संकेत नाहीत. मान्सूनपूर्व पावसाचे संकेत देणारे चातक व पावश्या पक्षी आजूनही नजरेस पडत नसल्याने या वर्षी पावसाळा लांबणीवर पडल्याचे चित्र आहे.

खात्रीलायक पावसाची नक्षत्रे कोरडी गेल्याने व अजूनही दमदार पावसाचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

चातकाप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणारा महत्वाचा दूत म्हणजे पावश्या हा पक्षी आहे… जुन्या काळातील शेतकरी पावश्याचा आवाज कानी पडला की शेतीच्या पेरणीची कामे सुरू करायची. आता मात्र काही अंशी परिस्थिती बदलली असून, पावसाचे संकेत देणारे पक्षीही गायब झाले आहेत.

Ahmednagarlive24 Office