Maharashtra Rain : राज्यात शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील तुरळक भाग वगळता हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहणार असून, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण गेले दोन दिवस कमी झाले आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवस पाऊस काही ठिकाणी विश्रांती घेण्याची शक्यता आहे. २ ऑगस्टनंतर राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
यंदा २४ जून रोजी राज्यात मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतरही १५ जुलैनंतर राज्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर राज्यातील मोठी तूट पावसाने भरून काढली. शनिवारी सायंकाळपर्यंत कोकण भागात पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले.
मुंबई येथे ७ मिमी, सांताक्रुझ १८, रत्नागिरी ५, तर डहाणूमध्ये ८ मिमी पाऊस बरसला. मध्य महाराष्ट्रातील पुणे येथे ०.८ मिमी, लोहगाव १, कोल्हापूर ३, महाबळेश्वर २५, नाशिक १, सांगली ०.२, सातारा १, तर सोलापूर येथे ०.३ मिमी पावसाची नोंद झाली.
मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर येथे १ मिमी, परभणी येथे १ मिमी पाऊस पडला. विदर्भातील गोंदिया येथे २ मिमी पाऊस नोंदवला गेला. घाटमाथ्यावर पाऊस सुरू आहे. लोणावळा येथे ८९ मिमी, शिरगाव ६५, ठाकूरवाडी १७, वळवण ७४, वाणगाव २५, भिवपुरी ६२, दावडी १०२, कोयना १३०,
खोपोली ७५, खंद ८३, ताम्हिणी १२०, भिरा ७१, तर धारावी येथे ४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ३० जुलै ते २ ऑगस्टदरम्यान कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.