Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून सोमवारी काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. मात्र पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील तुरळक भागात यलो अॅलर्ट असून मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र, पावसाचा जोर कमी राहणार असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे.
राज्यात ठिकठिकाणी १५ दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर गेले तीन-चार दिवस पावसाचा जोर ओसरला आहे. अनेक भागांत पावसाने उघडीप घेतली आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत.
सोमवारी सायंकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रातील पुणे शहरात ३.१ मिमी, लोहगाव ३, कोल्हापूर ५, महाबळेश्वर ८४, नाशिक ३, सांगली ३, साताऱ्यामध्ये ०.६ मिमी पावसाची नोंद झाली. कोकण भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईत १ मिमी, सांताक्रुझ ०.४, रत्नागिरी २, तर डहाणूमध्ये ४ मिमी पाऊस बरसला.
मराठवाड्यातील धाराशीवमध्ये ०.४ मिमी, छत्रपती संभाजीनगर ३, परभणीत ०.८ मिमी पाऊस पडला. विदर्भातील बुलढाण्यामध्ये १ मिमी पाऊस नोंदवला आहे.
घाटमाथ्यावरही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. लोणावळ्यामध्ये १७ मिमी, शिरगाव ८५, शिरोटा २७, ठाकूरवाडी १०, वळवण ३१, वाणगाव ९, अम्बोणे ६८, भिवपुरी २४, दावडी ६६, डुंगरवाडी ५५, कोयना ८२, खोपोली २९, खंद ३१, ताम्हिणी ५६, भिरा ३१, तर धारावीत ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान वर्ध्यामध्ये ३२.५ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वरमध्ये १७.९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.