Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे थैमान पाहायाला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होत आहे. राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात वादळी पावसाने हजेरी लावली आहे.
विशेष म्हणजे आज अर्थातच 12 मे 2024 ला राज्यातील तब्बल 33 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यातील नऊ जिल्ह्यांमध्ये गारपीट होणार असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून अखेर राज्यातील वादळी पावसाचे हे सत्र केव्हा थांबणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान याच संदर्भात जेष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात आणखी किती दिवस अवकाळी पावसाचे थैमान राहणार, राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार ? याबाबत माणिकराव खुळे यांनी मोठी माहिती दिली आहे.
आणखी किती दिवस महाराष्ट्रात वादळी पावसाचे सावट?
ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आणखी सात दिवस म्हणजेच 18 मे 2024 पर्यंत वादळी पावसाची शक्यता जाणवत आहे. या कालावधीत राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची हजेरी लागू शकते.
या काळात या कालावधीत खानदेश मधील धुळे, नंदुरबार, जळगाव, मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये, विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या अश्या 29 जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता राहणार आहे.
विशेष म्हणजे आज पासून पुढील तीन दिवस अर्थातच 14 मे पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये गारपीट होणार असा अंदाज आहे. कालावधीत राज्यातील मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाडा विभागातील धाराशिव, लातूर,
नांदेड आणि विदर्भ विभागातील यवतमाळ, गडचिरोली या आठ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासह गारपीटीची शक्यता असल्याचा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे. तसेच कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये 16 मे पर्यंत ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा अवकाळी पाऊस पाहायला मिळणार असा अंदाज आहे.
दरम्यान, वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता लक्षात घेता राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाचे आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जाणकार लोकांच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आहे.