येत्या ३० एप्रिल पर्यंत अवकाळीचे सावट, त्यानंतर उष्णतेची लाट ! वाचा हवामान अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : सध्या वातावरणातील बदलामुळे व मराठवाड्यावरील असणाऱ्या एक चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.

अहमदनगर, नाशिकमध्येही मागील काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. दरम्यान आता ३० एप्रिलपर्यंत कोकण वगळता राज्यात ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा ५ अंशांनी वाढल्याने रात्रीच्या उकाड्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीचे असलेले महाराष्ट्रातील वातावरण ३० एप्रिलपासून निवळण्याची शक्यता आहे.

असे’ आहे तापमान

नाशिक ३७.६, धाराशिव ४१७, माथेरान ३६.०, मालेगाव ४१.०, जालना ४०.५, परभणी ४२.२, बारामती ३९.८, बीड ४१.८, नांदेड ४१.२, कोल्हापूर ३०.५, उदगीर ४०.८, पुणे ४०.३, महाबळेश्वर ३२.५, छत्रपती संभाजीनगर ३९.६, सातारा ३८.२, अहमदनगर ३९.२, ठाणे ३९.४

‘असा’आहे हवामान तज्ज्ञांचा अंदाज

■ इराण, अफगाणिस्तान, दक्षिण पाकिस्तानातून गुजरातमार्गे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात उष्ण वारे वाहणार असल्याने १ मे पासून राज्यात उष्णता तसेच किमान व कमाल तापमानात वाढ होईल. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आज २७ ते २९ एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट राहील.

■ महाराष्ट्रात कोकण वगळता २९ एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी म्हणजे विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता कायम आहे. विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे.