Maharashtra News:मुंबईत दसऱ्या निमित्त शिवसेनेच्या दोन गटांचे मेळावे झाले. त्यासाठी झालेली गर्दी, भाषणे यावरून चर्चा सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात एका जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

नोंदणीकृत पक्ष नसताना शिंदे यांनी मेळाव्यासाठी कसा खर्च केला, यासाठी रोखीने पैसा कोठून आणला याची चौकशी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

दीपक जगदेव यांनी अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत केलेल्या या याचिकेवर १४ ऑक्टोबरला प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात एमएमआरडीए मैदानात शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने घेतलेल्या कार्यक्रमासाठी राज्य परिवहन सेवेच्या मुख्यत्वे ग्रामीण भागांतील नागरिकांच्या सेवेसाठी असलेल्या शेकडो एसटी बसगाड्या वापरण्यात आल्या.

त्यासाठी प्रचंड खर्च करतानाच मेळाव्याला जमलेल्या नागरिकांच्या खानपानसाठीही मोठा खर्च करण्यात आला. नोंदणीकृत पक्ष नसतानाही या गटाने १० कोटी रुपयांहून अधिक खर्च केला असून या पैशांचा स्रोत काय,

हे बेहिशेबी पैसे कुठून आले, याची चौकशी करण्याबाबत प्राप्तिकर विभाग व अन्य यंत्रणांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे. त्यामुळे चौकशीचे आदेश द्यावेत’, अशा विनंतीची फौजदारी रिट याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.