Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना न्यायालायने ३ महिन्यानंतर जामीन मंजूर केला. संजय राऊत हे काल तुरुंगातून बाहेर आले. तसेच रात्रीचा मुक्काम भांडुप येथील घरी केल्यानंतर त्यांनी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय यंत्रणांवर निशाणा साधला.

तसेच संजय राऊत यांनीही पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले त्यामध्ये तुरुंगात जाण्याची भीती वाटली नाही का? त्यांना तुरुंगात जाण्याची हिंमत कुठून आली? असे प्रश्न विचारण्यात आले.

पत्रकारांच्या प्रश्नांना संजय राऊत उत्तर देताना म्हणाले, मी तुरुंगात गेलो. मला खात्री होती. उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी आणि आदित्य ठाकरे माझ्या कुटुंबाची काळजी घेतील.

त्या हिंमतीवर मी तुरुंगात गेलो, असं सांगतानाच आमच्या मूळ शिवसेनेसाठी दहावेळा तुरुंगात पाठवलं तरी मी तुरुंगात जायला तयार आहे, असे संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, कधी तरी पक्षासाठी त्याग करण्याची वेळ येते. ती तयारी नसेल तर पक्षाने 40 वर्षात जे दिलं. त्याच्याशी कृतघ्नता ठरेल. बाळासाहेबांपासून आदित्यपर्यंतचं नातं टिकले पाहिजे. आम्ही कितीही सर्वोच्च स्थानी पोहोचलो तरी पक्षाशी बेईमानी करणे योग्य नाही असेही राऊत म्हणाले.

संजय राऊत पक्षाविषयी बोलताना म्हणाले, मी पक्षाला आई मानतो. कुठून काही तरी मिळतंय म्हणून पक्षाच्या पाठित खंजीर खुपसणे योग्य नाही. माझ्या सुटकेनंतर लोकांना आनंद झाला. ते शिवसैनिक होते.

ते सर्व अचानक बाहेर पडले. जेलच्या गेटमधून बाहेर पडताना मला अडिच तास लागले. एवढी गर्दी होती, असे सांगतानाच राज्यात शिवसेना एकच आहे. गटबिट काहीच नाही. आमच्या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हेच आहेत.

संजय राऊत यांनी जेलमध्ये काय केले हेही पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे, माझे पुस्तक तयार आहे. दोन पुस्तक मी तुरुंगात लिहिली आहेत. वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे. मी लिहिणारा माणूस आहे.

मी तुरुंगात वाचत होतो. जे वाचले मग पेपरच्या बातम्या. पुस्तकातील गोष्टी असो, जे आवडले ते टिपले. हे लोकांपर्यंत गेले पाहिजे. इतिहास आणि राजकीय घडामोडींचा या पुस्तकात मागोवा घेतला आहे.