file photo

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरच्या अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबर रोजी आग लागली होती. यात 11 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी पोपटराव पवार तेथे उपस्थित होते.

या दुःखद घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले पोपटराव पवार यांनी त्या दिवशी घडलेला प्रसंग सांगितला. पद्मश्री पुरस्कार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पवार यांना 72 तास आधी कोरोना चाचणी बंधनकारक होते. त्यासाठी ते जिल्हा रुग्णालयात गेले होते.

त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांची टीम तिथे होती. मी चाचणी केली. त्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्हा रुग्णालयातील नवीन ऑपरेशन थिएटर पाहण्याचा आग्रह केला. म्हणून ते पाहण्यासाठी गेलो. बसून चर्चाच सुरू होती. त्यावेळी आमची गाडीही कोविड अतिदक्षता विभागाच्या जवळ होती.

आमच्या गाडीच्या चालकाचा फोन आला. त्याला अतिदक्षता विभागाच्या खिडकीतून धूर येताना दिसला होता. ही माहिती मी देताच डॉ. घुगे पाहण्यासाठी गेले. तेवढ्यात मला दुसरा फोन आला. यात आग लागल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सर्वचे डॉक्टर व कर्मचारी घटनास्थळाच्या दिशेने धावले.

मी तिकडे धावत गेलो. तिदक्षता विभागातून धुराचे लोट येत होते. अतिदक्षता विभागाचा दरवाजा बंद होता. तो उघडण्याचा प्रयत्न डॉक्टर करत होते. तेवढ्यात अग्निशमन विभागाची गाडी आली. मात्र त्यांना मदत करण्यासाठी पुरेसे कर्मचारीही तेथे नव्हते. त्यांनी मला बोलावले.

मी व माझ्या वाहनाचा चालक धावतच मदतीला गेलो. तेवढ्यात अतिदक्षता विभागाचे दर उघडण्यात डॉ. घुगे व कर्मचाऱ्यांना यश आले. डॉ. घुगेंच्या हाताला काच लागल्याने त्यांना जखम झाली होती.

हातातून रक्त वाहत होते. रुग्णालय कर्मचाऱ्यांनी होते नव्हते सर्व अग्निशमन सिलेंडर आगीवर फवारले. त्यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांचा जो आक्रोश होता तो अजूनही माझ्या कानातून जात नाही, अशी माहिती पोपटराव पवार यांनी दिली.