Maharashtra Politics : राज्यात सध्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनीही शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याने चांगलेच राजकारण तापले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मनसेकडून या वक्तव्यांचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी या संदर्भात आंदोलने केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुधांशु त्रिवेदी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एक दोन नव्हे तर तब्बल पाच वेळा अफझल खानाला पत्रं लिहून माफी मागितली होती या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, पाच वेळा शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली होती हा ह्येच्या बापाने शिकवलेला का याला इतिहास. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात एकच तह झाला. तह. तो झाला मिर्जाराजे जयसिंगांबरोबर. त्याला पुरंदरचा तह म्हणतात, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय घडलं होत याबद्दल भाष्य केले आहे. ते म्हणाले, मिर्जाराजेंबरोबरच्या त्या वाटाघाटीनुसार ते औरंगजेबाच्या दरबारी गेले.

तिथे झालेला अपमान सहन न झाल्यामुळे जेवढे तहात किल्ले गेले होते त्यापेक्षा दुप्पट किल्ले औरंगजेबाकडून त्यांनी घेतले. हे होते शिवाजी महाराज, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राबद्दल खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या भावना जाणूनबुजून दुखावल्या जात आहे, असे मला वाटतंय. त्यांना वरच्यांचा आशीर्वाद आहे.

त्यांनी या अगोदर देखील शाहू फुले सावित्रीबाई यांच्याबाबत उद्गार काढले होते. महाराष्ट्राच्या मातीचा होईल तितका अपमान करायचा आणि हे दाखवून द्यायचे की तुम्ही मराठी माणसे माझे काही करू शकत नाही. असेच सुरू आहे, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.