अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- महागाईमुळे देशातील जनता भरडली गेली आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील शुल्कात कपात केली आहे.

त्यामुळे दिवाळीत पेट्रोल व डिझेल दर कमी झाले आहेत. यावरून सध्या राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधक भाजप यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करून सामान्य जनतेला दिवाळीत दिलासा दिला.

आता महाविकास आघाडी सरकार राज्याचे शुल्क कमी करेल की राज्यातील मंत्री तुपाशी व जनता उपाशी, अशी स्थिती कायम राहाणार, असा सवाल विखे पाटलांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचे काम सध्या महाविकास आघाडीचे मंत्री करतात.

केंद्र सरकारने जनतेला कोविड लस व धान्य मोफत दिले. कोविडने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना 50 हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. आता राज्य सरकारने पाच लाख रुपयांची मदत द्यावी, असे त्यांनी सांगितले.