अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलुप असल्यामुळे येथील आदिवासी महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारातच तीनचाकी टमटममध्ये प्रसुती करण्याची वेळ महिलेच्या कुटुंबावर आली.

घटनेची माहिती समजताच सुट्टी नसताना कामावर हजर नसणाऱ्या संबंधित डाॅॕक्टर व नर्सवर कारवाई करुन त्यांना निलंबित करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ऐन दिवाळी पाडव्याच्या दिवशी तालुक्यातील काष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राणी पप्पू बेरड (२३, रा. श्रीगोंदे फॅॕक्टरी) या आदिवासी महिलेचे बाळंतपणाचे दिवस पूर्ण झाल्याने पोटात त्रास होवू लागला म्हणून कुटुंबातील सदस्यांनी तीनचाकी रिक्षामध्ये महिला पेंशटला काष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता घेऊन आले.

रुग्णालयात आल्यानंतर काष्टी आरोग्य केंद्राला भर पाडवा सनाच्या दिवशी कुलुप असल्याने या महिलेच्या बाळंतपणाची मोठी हेळसांड झाली. घटनेची माहिती काष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते मदन गडदे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते यांना समजताच सदर आदिवासी कुटुंबाच्या मदतीला धावत आरोग्य अधिकारी डाॕॅ. कल्याण धुमाळ यांना संपर्क केला,

परंतु त्यांचा फोन बंद असल्याने नाइलाजाने तीनचाकी टमटममध्ये तीन नातेवाईक महिलांनी एकत्र येवून राणी बेरड या आदिवासी महिलेची कुठल्याही प्रकारची सोय नसताना नैसर्गिक सुखरूप बाळतंपण केले. प्राथमिक रुग्णालयात डाॕक्टर आणि नर्स यांना सेवा करताना २४ तास कामावर असणे बंधनकारक आहे.

परंतु अनेक नर्स व डाॕॅक्टर्स नियमांचे पालन करताना दिसत नसून वरिष्ठ देखील त्यांची पाठराखण करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकरणात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.