file photo

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :-  सर्वत्र नवरात्रोत्सव जोरदार सुरु आहे. भक्तिमय वातावरणात सुरु असलेल्या या सणवार चोरट्यांचे सावट पसरू लागले आहे. यामुळे महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवरात्रोत्सवात दर्शनासाठी महिलांची गर्दी होऊ लागल्याने चोरट्यांकडून या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेण्याचे प्रमाण वाढले आहे.

नगर शहराजवळील बुर्‍हाणनगर येथील तुळजा भवानी माता मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या ६० वर्षिय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत स्नेहप्रभा भीमराज वरखेडकर (रा.न्युक्लइस हॉस्पिटल शेजारी, सावेडी) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तर पाथर्डी तालुक्यातील मोहोटादेवी मंदिर परिसरात चांगदेव अंशाबापू खिलारी (रा.राहुरी) हे त्यांच्या पत्नीसमवेत मोहटादेवी गडावर दर्शनासाठी गेले होते.

तेथून परतताना मंदिराच्या कमानी जवळ दोघे एस.टी. बसमध्ये बसत असताना एका महिलेने फिर्यादी चांगदेव खिलारी यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडले.

मात्र उपस्थित नागरिकांनी तिला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. अशा घटनांमुळे देवदर्शनासाठी जाणार्‍या महिलांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.