file photo

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- नगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणाला भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

संतोष बन्सी डावखर (वय ३०, गटेवाडी, पारनेर ) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी संतोषचा थोरला भाऊ रामदासचा याच मार्गावर म्हसणे फाट्यावर अपघाती मृत्यू झाला होता.

दोन वर्षांच्या अंतराने दोन्ही सख्ख्या भावांच्या अपघाती मृत्यूने डावखर कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. संतोष मंगळवारी सकाळी सुपे येथे किटकनाशक आणण्यासाठी गेला होता.

सुपे येथून परतताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तो गटेवाडी येथे जाण्यासाठी जातेगाव फाट्यावर नगर-पुणे महामार्गाच्या कडेला उभा असताना संतोषला कारने (क्रमांक एमएच १४ जे ९४२७) धडक दिली.

या धडकेने संतोषच्या डोक्याला जबर मार लागला. अपघातात त्याचे दोन्ही पाय मोडले.संतोषचा जागीच मृत्यू झाला. सुपे पोलिसांनी कार चालक दिलीप एकनाथ बुचुडे (नायगाव, श्रीरामपूर) याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

संतोषच्या मागे त्याची पत्नी दोन लहान मुले व वडील असा परिवार आहे. दोन सख्ख्या भावांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.