अकोला : राज्यात हिंदुत्व (Hindutva) आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मध्यंतरी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा केलेला हट्ट आणि त्यानंतर त्यांना झालेली अटक. या सर्व प्रकरणावर पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला आहे.

बच्चू कडू म्हणाले, तुरूंगात मारहाण झाली नाही म्हणून राणा दाम्पत्याने सरकारचे आभार मानावे. प्रामाणिक दादागिरीतूनच शिवसेनेची निर्मिती झाली. शिवसेनेची दादागिरी वायफळ नाही आहे.

मातोश्री हे शिवसेनेचे श्रद्धास्थान आहे, प्रेरणा स्थान आहे. तिथे जाऊन तुम्ही अशा पद्धतीने वागता, ही दादागिरी नाही का? असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बच्चू कडू बोलत होते.

हनुमान चाळीसावरून बच्चू कडू म्हणाले, आपापल्या धर्मातील लोकांनी घरात, मंदीर, मस्जिदमध्ये दहा वेळा त्यांनी म्हणावे. रस्त्यावर येण्याचा हा विषय नाही आहे.

रस्त्यावर फडकाविण्याचा विषय असेल तर तिरंगा फडकावा. गरीबांची सेवा करा, रुग्णालयात जा, हनुमान चालीसाचा सात दिवसांचा सप्ताह ठेवा, आम्ही त्यांना वर्गणी देऊ, असेही ते म्हणाले आहेत.

तुम्हाला लाज नाही वाटत, अशा पद्धतीने वागता. तुमच्या घरासमोर एखादा कार्यक्रम ठेवला तर चालेल का तुम्हाला. अशा पद्धतीने करणे हे योग्य नाही आहे. मला वाटतं अशी दादागिरी आपण करायची, कोणी केली तर तुम्ही दादागिरी करता, असे आपण म्हणायचं.

आम्ही एक थापड मारतो, तुम्ही उभे रहा, असाच त्याचा अर्थ झाला? शिवसेना या मुठीतील नाही आहे. सुदैव तुमचं असं आहे तुम्हाला दणके बसले नाही, तुम्ही त्यातच खुशी माना असा टोलाही बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला लगावला आहे.