कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पूर्व सागरी किनाऱ्यावरील राज्यात वणव्यामुळे धगधगत्या ज्वालांचे आव्हान उभे राहिल्याने सरकारला अखेर आणीबाणी घोषित करावी लागली. भारतात मान्सून गरजेपेक्षा जास्त काळ थांबल्यामुळे ऑस्ट्रेलियावर बिकट परिस्थिती ओढावल्याचा दावा पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
जवळपास १० लाख हेक्टर परिसरातील भीषण वणव्यामुळे न्यू साऊथ वेल्स राज्यात आगीत होरपळून तिघांचा मृत्यू झाला, तर १५०हून अधिक घरांचा कोळसा झाल्याने हाहाकार उडाल्यानंतर आणीबाणी घोषित करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला.
वणव्यामुळे स्थानिकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. आणीबाणी घोषित केल्यामुळे ग्रामीण अग्निशमन सेवा विभाग किंवा सरकारी संस्थेला कोणतेही कार्य सुरू करण्याचे किंवा बंद करण्यासाठीचे निर्देश देण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
मेलबर्न विद्यापीठाशी निगडित व इंधन, हवामान व भौगोलिक परिस्थितीचे वास्तविक चित्रणावर प्रयोग करून जंगलातील वणव्याची रचना व निसर्गाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ ट्रेंट पेनहन यांनी भारतात मान्सून उशिरापर्यंत थांबल्यामुळे न्यू साऊथ वेल्स राज्याला भयंकर वणव्याचा सामना करावा लागत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.