भिडे गुरुजी म्हणतात भारताने जगाला दिलेला बुद्ध उपयोगाचा नाही !

Ahmednagarlive24
Published:

सांगली : संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने जगाला बुद्ध दिला असल्याचे वक्तव्य केले होते. वास्तविक भारताने जगाला बुद्ध दिला परंतु तो अजिबात उपयोगाचा नाही.

हिंदुस्थानचा संसार सुखाने चालवायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पंतप्रधान चुकीचे बोलले असल्याचे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केले.

दुर्गामाता दौडीच्या पहिल्या दिवशी माधवनगर रस्त्यावर असणाऱ्या दुर्गामाता मंदिरासमोर धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना भिडे बोलत होते. शहरातील मारुती मंदिरानजीक असणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्यासमोर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भगवे फेटे आणि पांढऱ्या टोप्या परिधान करुन दुर्गाभक्त उपस्थित होते.

सांगली-मिरज- कुपवाड महापालिकेच्या महापौर संगीता खोत यांच्याहस्ते ध्वजपूजन केल्यानंतर दौडीस प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरुन दौड दुर्गामाता मंदिरासमोर आली. तेथे दुर्गामातेची आरती करण्यात आल्यानंतर उपस्थितांना भिडे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी भिडे म्हणाले, भारताने जगाला बुद्ध दिला असे पंतप्रधान म्हणतात. परंतु त्याचा काहीही उपयोग नाही. पंतप्रधान चुकीचे बोलले. त्यांची ही चूक सुधारण्याची संधी महाराष्ट्राला मिळालेली आहे. छत्रपती शिवरायांची परंपराच ते करु शकते. हे काम आपले आहे.

हिंदुस्थानचा संसार सुखाने चालविण्यासाठीच आपण दुर्गामातेच्या पायाशी आशीर्वाद मागायला एकत्र आलो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गणेशोत्सवात भिडे यांनी गांधीवादावर टीका केली होती.

पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळाने उभारलेल्या भव्य राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ते म्हणाले होते, देशाला सध्या गांधीवादामुळे प्रचंड वेदना होत आहेत. आपल्याला यातून सुटका करुन घ्यायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा आदर्श घेतला पाहिजे.

ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला भूतबाधा होते त्याप्रमाणे सध्या देश गांधीवादातून जात असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता नवरात्रात पुन्हा एकदा अहिंसेचा संदेश देणाऱ्या बुद्धावर भिडे यांनी प्रहार केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment