Maharashtra

महापौर निवडणुकीवरून राष्ट्रवादीत खळबळ

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीवरून राष्ट्रवादीअंतर्गत खळबळ उडाली आहे. राज्य व देश पातळीवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशभरातील विरोधकांची एकत्रित आघाडी तयार करण्याच्या प्रक्रियेत असताना स्थानिक नगरच्या पातळीवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला मतदान करून निवडून आणल्याच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. सर्व १८ नगरसेवकांसह शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

महापौर-उपमहापौर निवडणुकीआधी सुरू असलेल्या विविध चर्चांच्या काळात पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याचे स्पष्ट केले होते. तसेच माजी आमदार दादा कळमकर यांनीही नगरसेवकांच्या बैठकांतून वेळप्रसंगी भाजपसमवेत जाण्याची तयारी ठेवण्याचे सांगितले होते. हे दोन्ही स्थानिक पातळीवरील वरिष्ठ नेते पक्षाचे राज्यस्तरीय पदाधिकारी व ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याशिवाय असे भाष्य करणार नाहीत, असे नगरसेवकांना वाटले व म्हणून त्यांनी भाजपला मतदान करण्याच्या स्थानिक स्तरावरील निर्णयाची अंमलबजावणी केली, असे नगरसेवकांकडून सांगितले जाते.

शिवाय भाजपचा महापौर निवडला गेल्यानंतर कळमकर यांनी या निर्णयाशी आपण सहमत नाही, जगताप पिता-पुत्रांचा हा निर्णय असल्याचे स्पष्ट करताना भूमिका बदलल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या पार्श्वभूमीवर पक्षाकडून आलेल्या नोटिसांना लेखी उत्तर देण्याऐवजी थेट ‘साहेबां’नाच भेटून बाजू मांडण्याचे काहींनी ठरवले आहे व त्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले जाते.

—————————-
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button